Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये 9 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी पूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळं अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे.
Rain : मुसळधार पावसामुळं अमरनाथ यात्रेतही व्यत्यय येण्याची शक्यता
जम्मू विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर या कालावधीत काश्मीर विभागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळं अमरनाथ यात्रेतही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. नद्यांसह स्थानिक नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अचानक पूर येऊ शकतो, पाणी साचू शकते. अतिसंवेदनशील ठिकाणी दरड कोसळणे, खडक कोसळणण्याचा धोकाही असू शकतो.
उत्तर प्रदेशात मुसळदार पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांसाठी हा मोसमी पाऊस अडचणीचा ठरला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन-तीन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब हरियाणामध्ये मुसळधार पाऊस
हरियाणा आणि पंजाबमध्ये मान्सूनने आता वेग पकडला आहे. पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. लुधियानामध्ये पावसाने 50 वर्षांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी तुंबले आहे. दुसरीकडे, हरियाणातील 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला, ज्यामध्ये कैथलमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पावसामुळे पंजाबच्या तापमानात 8 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे.