Heat Wave: देशासह जगातील अनेक देशही वाढत्या उष्णतेमुळे हैराण आहेत. मे महिन्याचे सुरुवातीचे काही दिवस दिलासा देणारे होते, पण त्यानंतर वाढलेल्या भीषण उष्णतेनं पुन्हा अंगाची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली. यंदा प्रचंड उकाडा, तर पाऊस मात्र कमीच राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामागील कारण 'एल-निनो' असल्याचं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी उष्णता वाढणार असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. आत हे 'एल-निनो' (El-Nino) प्रकरण नेमकं आहे काय? जाणून घेऊया सविस्तर... 


समुद्रात उसळणार उष्ण लाटा


अमेरिकन स्पेस एजन्सी नासानं (NASA) आपल्या सेंटिनेल-6 मायकेल फ्रिलिश उपग्रहातून पृथ्वीवर उष्णतेच्या लाटा वाहत असल्याचं पाहिलं आहे. याच लाटांचं रुपांतर एल-निनो मध्ये होत असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. त्यांना 'केल्विन लहरी' म्हणतात. नासानं अवकाशातूनच या लहरी टिपल्या आहेत. उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रांनुसार, प्रशांत महासागरात या लाटा भारतासह संपूर्ण आशियाकडे सरकत आहेत. या लाटा फक्त 2 ते 4 इंच उंचीच्या आहेत. पण त्यांची रुंदी हजारो किलोमीटर आहे.


...म्हणून मे महिन्यात पडली होती थंडी 


नासाच्या म्हणण्यानुसार, ही मार्च-एप्रिलची गोष्ट आहे, जेव्हा प्रशांत महासागरातील उबदार पाण्याची लाट दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यापासून पूर्वेकडे आली होती. यामुळेच मे महिन्यात आधी थंडी पडली आणि नंतर अचानक उष्णता वाढली. या लाटा एल-निनोच्या आधीच्या लाटा म्हणूनही ओळखल्या जातात.


जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये सेंटिनेल-6 मायकेल फ्रिलिश उपग्रहाच्या मदतीनं एल-निनोवर शास्त्रज्ञ एल-निनोवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, वेळोवेळी त्याचं निरीक्षण करुन हवामानासंदर्भातील नवी माहिती ते सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. शास्त्रज्ञ जोश विलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ही 'एल-निनो'ची लाट मोठी झाली तर संपूर्ण जग भयंकर उष्णतेच्या कचाट्यात सापडेल. 


मोडीत निघतील सारे रेकॉर्ड्स 


नासानं जारी केलेल्या नकाशात लाल आणि पांढऱ्या रंगाचे समुद्राचे क्षेत्र दिसत आहे, तिथे गरम पाणी वाहत आहे. या गरम पाण्यामुळे देशाच्या विविध भागात भयंकर उष्मा आणि पावसाळा येणार आहे. जोश विलिस यांच्या मते यावेळी एल-निनो आणि सुपरचार्ज केलेले समुद्राचं तापमान एकत्र येत आहे. त्यामुळे पुढील 12 महिने अनेक प्रकारचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. यातील बहुतांश तापमान कमाल तापमानाशी संबंधित असेल.


'एल निनो' म्हणजे काय? 


एल निनो आणि ला निना सागरी प्रवाह आहेत. याचा मॉन्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम होतो आणि भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होतो. पेरु आणि चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृत्तालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात आणि त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल-निनो परिणाम चालू मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो.