Prophet Mohammed Row : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जमशेद पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याआधी 1 जुलै रोजी या खंडपीठात नुपूर यांची यापूर्वीची याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली होती. तेव्हा खंडपीठाने कठोर शब्दात टिप्पणी करत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. दरम्यान, नव्या याचिकेत नुपूरने तिच्या अटकेला स्थगिती द्यावी आणि तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.


दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता


नुपूर शर्मा प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. सुनावणीसाठी आधीच जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन्ही न्यायाधीश मंगळवारी वेगवेगळ्या खंडपीठांचा भाग बनणार आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी त्यांना न्यायाधीशांना आपले पूर्वनियोजित काम पूर्ण करून एकत्र बसावे लागेल. त्यामुळे या याचिकेची सुनावणी दुपारनंतरच होणे अपेक्षित आहे.


9 एफआयआरमध्ये अटकेवर स्थगिती देण्याची मागणी
नुपूर यांनी नव्या याचिकेत म्हटलंय की, 1 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना अनपेक्षितपणे कठोर टिप्पणी केली होती. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आणखी वाढला आहे. नुपूरने 8 राज्यांत तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या 9 एफआयआरमध्ये अटकेवर स्थगिती देण्याची मागणी केली आहे. यासोबतच सर्व खटले एकत्र करून दिल्लीला वर्ग करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. केंद्राव्यतिरिक्त दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि आसाम या आठ राज्यांना याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे.



बिघडलेल्या परिस्थितीला नुपूर शर्मा जबाबदार - कोर्ट


1 जुलै रोजी, नुपूरच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, तसेच प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तिच्यावर विविध राज्यांत दाखल झालेले खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने नुपूरला फटकारले आणि देशाच्या बिघडलेल्या स्थितीला ती एकटीच जबाबदार असल्याचे म्हटले होते. उदयपूरमध्ये घडलेली दुर्दैवी घटना नूपूरच्या वक्तव्याचा परिणाम असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. तसेच न्यायमूर्ती म्हणाले होते, "तुमच्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. तुम्ही उशिरा माफी मागितली, तीही या अटीसह की, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी विधान मागे घेते. तुम्ही राष्ट्रीय टीव्हीवर यावे. संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे


दिल्ली पोलिसांची खरडपट्टी


न्यायालयाने त्या दिवशी दिल्ली पोलिसांचीही खरडपट्टी काढली होती. म्हणाले, "दिल्लीत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये काय कारवाई करण्यात आली आहे? इथे, कदाचित पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकले असेल? तुम्हाला विशेष दर्जा मिळत असेल. पण असा दर्जा न्यायालयात मिळणार नाही. तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. प्रत्येक राज्याचे उच्च न्यायालयात तुमचे मत मांडा, तसेच खालच्या न्यायालयातून जामीन मिळवू शकता.