नवी दिल्ली : दिल्लीत मौजपूरजवळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे विरोधक आणि समर्थकांमध्ये दगडफेकीची घटना समोर आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोध प्रदर्शनादरम्यान झालेल्या दगडफेकीत एका पोलीस कॉन्स्टेबलचाही मृत्यू झाला आहे. रतनलाल असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामध्ये 37 पोलीसही जखमी झाले आहेत. यामध्ये पोलीस उपायुक्त अमित शर्मा हे देखील जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. हिंसेच्या घटनेनंतर पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीतील दहा ठिकाणी कलम 144 आणि संचारबंदी लागू केली आहे.
दिल्लीच्या उत्तर-पूर्व दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर परिसरात आंदोलकांनी काही घरांनाही आग लागली. ज्यामुळे परिसरात तणाव वाढला होता. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात सीएए आणि एनआरसीवरुन आंदोलन सुरु आहे. सीएए-एनआरसी समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने त्याचं रुपांतर हिंसाचारात झालं. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने मोठं तणावाचं वातावरण त्याठिकाणी निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
तणावाची परिस्थिती लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर रेल्वेस्टेनशची प्रवेशद्वारं देखील बंद केली आहेत. जाफराबाद मेट्रो स्टेशन गेल्या 24 तासांपासून बंद आहे. रविवारीही अशीच परिस्थिही या परिसरात होती. त्यानंतर दिल्लीतील इतर परिसरातही या प्रकारची आंदोलनं सुरु झाली.