मुंबई : कोटक वेल्थ अॅण्ड हुरुन इंडियाने 2020 मधील देशातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 54,850 कोटी आहे. तर या यादीत 'द बायोकॉन'च्या किरण मजुमदार शॉ 36,600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.


रोशनी या HCL चे संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या
रोशनी नाडर मल्होत्रा या एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक आणि सीईओ पदावर आहेत. यासोबतच एचसीएल टेक्नोलॉजीज बोर्डाच्या उपाध्यक्ष आणि शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्तही होत्या. 38 वर्षीय रोशनी नाडर मल्होत्रा, एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर यांच्या कन्या आहेत. यंदा जुलै महिन्यात आयटीमधील अव्वल कंपनी असलेल्या एचसीएलने घोषणा केली होती, अध्यक्ष शिव नडार पद सोडायचं आहे. यानंतर शिव नाडर यांनी आपल्या साम्राज्याची धुरा रोशनी नाडर यांच्यावर सोपवली होती.


शिखर मल्होत्रा यांच्याशी विवाह
वयाच्या 28 व्या वर्षी कंपनीच्या सीईओ बनलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचं बालपणही तिथेच गेलं. त्यांनी वसंत व्हॅली स्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं. यानंतर अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली. याच विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून रोशनी यांनी एमबीए पूर्ण केलं. रोशनी यांनी 2009 मध्ये एचसीएल कॉर्पमध्ये सामील होण्यापूर्वी यूकेतील स्काय न्यूज आणि अमेरिकेतील सीएनएनसोबत प्रोड्यूसर म्हणून काम केलं. 2010 मध्ये त्यांनी एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केलं. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुलं आहेत.


फोर्ब्सच्या 100 प्रभावी महिलांच्या यादीत रोशनी मल्होत्रांचा समावेश
वाईल्ड लाईफ आणि कन्झर्वेशनमध्ये रस असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 2018 मध्ये 'द हॅविट्स ट्रस्ट'ची स्थापना केली होती. यामागचा उद्देश हा देशातील निसर्गरम्य, नैसर्गिक स्थळं आणि स्वदेशी प्रजातींची सुरक्षा करण्याचा होता. 2019 मधील फोर्ब्सच्या जगातील सर्वात प्रभावी 100 महिलांच्या यादीतही रोशनी 54 व्या स्थानावर होत्या. या यादीत त्या 2017 ते 2019 अशा सलग तीन वर्ष होत्या.