कोलकाता : कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी खूप दिवस चर्चेत असलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी शमीला कोलकात्यातील अलीपूर कोर्टानं क्लिन चीट दिली आहे.
मोहम्मद शमीविरुद्ध त्याची पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसाचाराची आणि लग्नानंतर इतर स्त्रियांशी संबंध ठेवल्याची केस दाखल केली होती. त्यानंतर कोलकात्यातल्या अलीपूर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान कोर्टानं घरगुती हिंसेची कोणतीही केस दाखल करता येत नसल्याचे सांगत शमीला क्लिन चीट दिली.
मोहम्मद शमीने यापूर्वीच पत्नीने केलेल्या आरोपांचे खंडण केल होते. आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व खोट्या असून, आमच्याविरुद्ध रचलेलं हे मोठे षडयंत्र आहे. तसेच हा केवळ मला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे शमीने स्पष्ट केले होते.
हसीन जहाँने काय आरोप केले होते?
हसीन जहाँने मोहम्मद शमीवर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारासह अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप हसीन जहाँने केला होता.