चंदीगड : भारताची उदयोन्मुख पैलवान निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात इसमांनी सोनिपतमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची अफवा पसरली होती. आता त्यावर स्वत: निशा दहियाने खुलासा केला असून आपण सुरक्षित आहोत, आपल्याला काहीही झालं नसल्याचं सांगितलं आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली आहे.
निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात इसमांनी सोनिपतमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती गेल्या काही वेळेपूर्वी आली होती. हरियाणामधल्या सोनिपत येथील सुशीलकुमार रेसलिंग अॅकॅडमी परिसरात ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं. या गोळाबारात निशाची आई धनपती याही गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना रोहतकमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. आता या सर्व बातम्या अफवा असल्याचं निशा दहियाने स्पष्ट केलं आहे.
निशा दहिया हिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्याला काहीही झालं नसून आपण एकदम सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या बाजूला साक्षी मलिकही दिसत आहे.
निशा दहिया ही भारताची उदयोन्मुख पैलवान असून 23 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निशाचं कौतुक केलं होतं.