पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करते. त्यासाठी ती क्लासला जात होती, त्यावेळी गावातीलच तीन जण पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचं अपहरण केलं. या तिघांनी तरुणीला महेंद्रगढ आणि झज्जर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतात, एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काही नराधम आधीच हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या 12 जणांनी मुलीच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले.
या सर्व पाशवी कृत्यानंतर नराधमांनी दुपारी चारच्या सुमारास पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पोबारा केला. संतापाचा कळस म्हणजे आरोपी नराधमांपैकी एकाने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचं सांगितलं. या फोननंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, समोर जे चित्र होतं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.
पीडित कुटुंबाने याबाबतची तक्रार रेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याऐजी, कुटुंबाला हद्दीचं कारण दिलं. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितलं. तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचं सांगत, परतवून लावलं.
हरियाणात भाजपशासित मनोहरलाल खट्टर यांचं सरकार आहे. मुख्यमंत्री खट्टर याप्रकरणी काय भूमिका घेतात, संबंधित पोलिसांवर काय कारवाई करतात, आणि आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'कुठे आहे बेटी पढाव, बेटी बचाव'
या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
"माझ्या मुलीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या बेटीचं कौतुक केलं होतं. मोदी म्हणतात 'बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ', मग आता काय करायचं? आता माझ्या मुलीला न्याय कोण देईल? अशी उद्विग्न प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली.