लखनौ : भीम आर्मीचा संस्थापक आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या दंगलीतील आरोपी चंद्रशेखर आझाद उर्फ रावणची तुरुंगातून सुटका झाली आहे. रात्री अडीचच्या सुमारास रावणला जेलमधून सोडण्यात आलं. योगी सरकारने बुधवारीच रावणला जेलमधून सोडण्याचा आदेश दिला होता.


सहारनपूरमध्ये मे 2017 मधील जातीय दंगल भडकावण्याच्या आरोपात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) बेड्या ठोकल्या होत्या. चंद्रशेखर 16 महिने जेलमध्ये होता. चंद्रशेखरच्या सुटकेच्या वेळी समर्थक मोठ्या संख्येने जेलबाहेर उपस्थित होते.

बाहेर येताच भाजपवर प्रहार
सहारनपूरच्या जेलमधून बाहेर येताच चंद्रशेखर रावणने सभेला संबोधित केलं. यावेळी त्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचं आहे. भाजप सत्तेतच नाही तर विरोधी पक्षामध्येही येणार नाही. भाजपला सत्तेतून उखडून टाकू, अशी घोषणा चंद्रशेखर रावणने केली.

आईच्या विनंतीवरुन सुटका : योगी सरकार
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बुधवारी त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. सरकारने निर्धारित वेळेच्या दोन महिने आधीच चंद्रशेखर रावणची सुटका करण्याचा निर्णय घेतला. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, "रावणच्या आईच्या विनंतीवर सहानुभूतीने विचार करुन वेळेआधीच त्याच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे." चंद्रशेखर रावणला नियमानुसार 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत जेलमध्ये राहायचं होतं. पण गुरुवारी रात्रीच त्याला सोडण्यात आलं. रावणशिवाय सोनू पुत्र नाथीराम आणि शिवकुमार पुत्र रामदास या दोन आरोपींचीही सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय?
रावणच्या सुटकेचा निर्णय हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं म्हटलं जात आहे. योगी सरकारने लोकसभा निवडणुकीआधी भीम आर्मी आणि अनुसूचित जाती/जमातीमधील नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी रावणला वेळेआधी सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सहारनपूरमध्ये दंगल
मागील वर्षी मे महिन्यात अनुसूचित जाती/जमाती आणि ठाकूरांमध्ये उफाळलेल्या जातीय दंगलीमुळे सुमारे एक महिना जिल्ह्यात तणाव होता. भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर हा हिंसेचा मुख्य आरोपी असल्याचं सांगत पोलिसांनी त्याला अटक करुन खटला दाखल केला होता.

यानंतर सहारनपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवानानंतर रावणविरोधात रासुका लावण्यात आला. याचा भीम आर्मीने विरोध केला होता. तसंच रावणच्या सुटकेच्या मागणीसाठी लखनौ ते दिल्ली असा निषेधही केला होता.

भीम आर्मीचा पश्चिमी यूपीमध्ये जास्त प्रभाव आहे. मागील तीन वर्षांतील आंदोलनामुळे भीम आर्मीने बहुजन समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या कॅराना आणि नूरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपची मत भीम आर्मी विभागल्याचं म्हटलं जात आहे.