Nupur Sharma : बीएसएफने (BSF) पाकिस्तानच्या (pakistan) सीमेवरून एका घुसखोराला ताब्यात घेतले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी हा संशयित पाकिस्तानातून भारतात आला होता असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. बीएसएफने या संशयिताला राजस्थामधील श्रीगंगानगर येथून ताब्यात घेतले आहे. रिझवान अश्रफ असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून त्याची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे.

  
  
बीएसएफने ताब्यात घेतलेला रिझवान हा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मंडी बहाव बीन येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान याने एका मौलवीसोबत बैठक घेतली होती आणि यामध्ये नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी भारतात घुसखोरी करण्याचे नियोजन झाले होते. हिंदुमलकोट चेकपोस्टच्या खंखा चेकपोस्टवर भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना बीएसएफने त्याला ताब्यात घेतले. सध्या पाच एजन्सी रिझवान याची चौकशी करत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान हा पाकिस्तानच्या मंडी भाऊद्दीन भागात मौलवींच्या बैठकीत सहभागी झाला होता. याआधी रिझवान याने पाकिस्तानच्या मंडी भाऊद्दीन भागातून लाहोरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हा प्रयत्न फसल्यामुळे त्याने साहिवालमार्गे हिंदुमलकोटमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन केले. येथून घुसखोरी करण्याच्या तयारीत असताना बीएसएफने त्याला ताब्यात घेतले. 


भारतात प्रवेश केल्यानंतर रिझवान  श्रीगंगानगर ते अजमेर शरीफ दर्ग्याकडे जाणार होता. तेथे दर्ग्यात चादर चढवल्यानंतर नुपूर शर्मा यांची हत्या करणार होता. परंतु, बीएसएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्लॅन फसला.  


 प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीमुळे नुपूर शर्मा अडचणीत आल्या आहेत. वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर भाजपने त्यांनी प्रवक्ते पदावरून हटवले आहे. भारतासह परदेशातून देखील शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. याच प्रकरणी आज शर्मा यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला  आहे.  सध्या कोणत्याही राज्यातील पोलिसांनी शर्मा यांना अटक करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 


महत्वाच्या बातम्या


'कोणत्याही राज्यातील पोलिसांनी अटकेची कारवाई नये', नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा