दिवसाढवळ्या काँग्रेस प्रवक्त्याची गोळ्या झाडून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2019 12:39 PM (IST)
हरियाणामधील फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली आहे.
चंदीगड : हरियाणामधील फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांची काही अज्ञातांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली आहे. त्यांच्यावर 8 ते 10 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान स्थानिकांनी जखमी झालेल्या विकास चौधरी यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांच्या हत्येनंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी खट्टर सरकारला लक्ष्य केले आहे. हरियाणामधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. विकास चौधरी फरिदाबादमधील सेक्टर 9 मधील पीएचसी जिममध्ये दररोज व्यायाम करण्यासाठी जात होते. आज (गुरुवार) जिममधून व्यायाम करुन चौधरी बाहेर पडले. ते त्यांच्या गाडीत बसत असताना काही लोक तिथे आले. त्यांनी चौधरी यांच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. दरम्यान तपासावेळी पोलिसांना घटनास्थळावर 12 गोळ्यांच्या कॅप्स सापडल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करुन म्हटले आहे की, भाजपच्या राज्यात हरियाणामध्ये गुंडाराज आणि झुंडशाही वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा चुराडा झाला आहे. गुंड, समाजकंटकांचा सर्वत्र बोलबाला आहे. या संपूर्ण परिस्थितीला खट्टर सरकार जबाबदार आहे. सुरजेवाला यांनी विकास चौधरींच्या हत्येचा निश्पक्ष तपास केला जावा, असी मागणी मांडली आहे. तसेच भाजप सरकारकडे मागणी मांडली आहे की, चौधरी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा द्यावी.