चंदीगड : भारतीय सैन्यात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाची पोलखोल करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करुन चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

बीएसएफमधून निलंबित झालेले जवान तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहित, गुरुवार संध्याकाळी रेवाडीच्या शांती विहार कॉलनीमधील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहित घरी आला होता. त्याचे वडील म्हणजेच तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागला गेले आहेत. तर आई घरीच होती. गुरुवारी संध्याकाळी रोहितने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याच्या आईने पोलिसांना कळवलं.

या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, "रोहितने आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. घटनास्थळावर पोहोचलो असता, आम्हाला त्याची खोली आतून बंद असल्याचं कळलं. दरवाजा तोडून आत गेल्यावर मोठ्या बेडवर रोहित मृतावस्थेत सापडला आणि त्याच्या हातात एक पिस्तुलही होती. त्याचे वडील सध्या कुंभमेळ्यात गेले आहे, आम्ही त्यांना या घटनेची माहिती दिली आहे."


या घटनेत वापरलेल्या पिस्तुलचा परवाना होता की अवैध होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.

तेज बहादूर यांचा व्हिडीओ व्हायरल
वर्षभरापूर्वी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सैन्यात जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता, जो अतिशय व्हायरल झाला होता. यावर मोठा वादही झाला. पंतप्रधान कार्यालयानेही याची दखल घेतली होती. बीएसएफने नंतर तेज बहादूर यादव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केलं होतं. तेज बहादूर मूळचे हरियाणाच्या महेंद्रगडचे असून ते कुटुंबासह रेवाडीमध्येच राहतात.