सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना, सीबीआयचे संयुक्त संचालक अरुणकुमार शर्मा, डीआयजी मनिषकुमार सिन्हा, पोलीस अधीक्षक जयंत नाईकनवरे यांचा कार्यकाळ घटवण्यात आला आहे. तसेच तत्काळ हे आदेश लागू करण्यात येत असल्याचेही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हटले आहे.
सीबीआयचे तत्कालीन संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. दोघांनीही एकमेकांवर जाहीररित्या विविध प्रकारचे आरोप केले होते. या घटनेला माध्यमांनी सीबीआय विरुद्ध सीबीआय असे युद्ध सुरु असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर #CBIvsCBI हा हॅशटॅग खूप दिवस ट्रेन्डमध्ये होता. या वादानंतर केंद्र सरकारने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी आलोक वर्मा यांनी सीबीआयच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुन्हा जुन्या पदावर बदली केली होती. सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.