हरियाणात 12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्याला फाशी
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2018 08:55 AM (IST)
हरियाणा विधानसभेने गुरुवारी या ऐतिहासिक कायद्याला एकमताने मंजुरी दिली.
चंदिगढ : हरियाणामध्ये बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला थेट फाशीची शिक्षा होणार आहे. बलात्काऱ्याला फाशीची शिक्षा सुनावणारं हरियाणा हे देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. 12 वर्षाखालील बालिकेवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावली जाणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्यथित होऊन काही महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर हरियाणा विधानसभेने गुरुवारी या ऐतिहासिक कायद्याला एकमताने मंजुरी दिली. भाजपसोबतच इंडियन नॅशनल लोकदल आणि काँग्रेस आमदारांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, बलात्कार पीडितेचं वय काहीही असो, दोषींना फाशीच हवी, अशी मागणीही काँग्रेस आमदार किरण चौधरींनी केली.