नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारविरोधात आज लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून एनडीए सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

यापूर्वी याच मागणीसाठी आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंध्र प्रेशातील प्रमुख दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी अविश्वास ठरावाबाबत पत्र लिहून अनेक विरोधी पक्षांकडे पाठींब्याची मागणी केली आहे. तर वायएसआरचे खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा सचिवांना नोटीस देऊन, आजच्या कार्यसूचीत अविश्वास प्रस्ताव सामील करण्याची मागणी केली.

दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील गरज पडल्यास या अविश्वास ठरावाला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रस्तावाचं भविष्य अंधारात

अविश्वास ठरावावरील चर्चेसाठी किमान 50 खासदारांचा पाठिंबा गरजेचा असतो. मात्र वायएसआर काँग्रेसचे केवळ नऊच खासदार आहेत. त्यामुळे ते अन्य विरोधीपक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहेत.  अशावेळी वाएसआर काँग्रेसला आंध्रातील त्यांचा विरोधक टीडीपीने पाठिंबा दिला तर 9+16 म्हणजे  खासदारांची संख्या 25 होईल. याव्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके यासारखे प्रमुख विरोधीपक्ष हे आंध्रातील अंतर्गत राजकारणात पडण्याची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचं भविष्य अंधारात आहे.