नवी दिल्ली : गायिका हर्षिता दहियाची हत्या तिच्या मेहुण्यानेच घडवून आणल्याचं समोर आलं आहे. पोलिस चौकशीत आरोपी दिनेशने कबुली दिल्याचं पानिपतचे पोलिस उप अधीक्षक देश राज यांनी सांगितलं.


हर्षिताच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी तिची बहीण लताने आपला पती दिनेशवर आरोप केला होता. माणसं पाठवून दिनेशने हर्षिताचा जीव घेतल्याचा दावा लताने केला. दिनेशला शुक्रवारी पानिपत कोर्टात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

2014 मध्ये हर्षिता आणि लता यांच्या आईची हत्या करण्यात आली होती. दिनेशनेच हे हत्याकांड घडवलं असून हर्षिता त्याची मुख्य साक्षीदार होती. दिनेश या प्रकरणी तुरुंगाची हवा खात आहे. हर्षिताने मेहुण्याविरोधात बलात्काराची तक्रारही दाखल केली होती.

हरियाणात 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या


हर्षिता पानिपतमधील चामरा गावात परफॉर्म करुन घरी येत होती. दुपारी चार वाजताच्या सुमारास दोघांनी तिची गाडी अडवली. हर्षितासोबत असलेल्या तिघांना मारेकऱ्यांनी कारमधून खाली उतरवलं आणि तिच्यावर सात गोळ्या झाडल्या.

सातपैकी सहा गोळ्या हर्षिताचं डोकं आणि मानेत शिरल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. हर्षिता दिल्लीतील नरेला भागात राहायची.