नवी दिल्ली : संपूर्ण देशात 2015 मध्ये जल, वायू आणि इतर प्रकारच्य़ा प्रदुषणांमुळे 25 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. लान्सेट मेडिकलने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.


अध्ययनमध्ये म्हटलं की, “2015 मध्ये प्रदुषणामुळे भारतात सर्वाधिक म्हणजे 25 लाख जणांचा मृत्यू झाला. तर चीनमध्ये 18 लाख जणांचा मृत्यू प्रदुषणामुळे झाला.”

संशोधकांच्या मते, यातील सर्वाधिक मृत्यू हे वायू प्रदुषणामुळे झाले. वायू प्रदुषणामुळे अनेकांना हृदयाचे आजार, स्ट्रोक, फुफुसाचा कर्करोग, श्वसनाचे विकार सीओपीडीसारखे गंभीर आजार झाले.

अहवालातील आकडेवारीनुसार, 2015 मध्ये जगभरात वायू प्रदुषणामुळे एकूण 65 लाख जणांचा मृत्यू झाला. तर जल प्रदुषणामुळे 18 लाख जणांचा मृत्यू झाला. तर 8 लाख जणांचा इतर प्रकारच्या प्रदुषणांमुळे झाला.

या संशोधनामध्ये आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेची इकाना स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेचे तज्ज्ञ सहभागी होते. मृत व्यक्तींमध्ये 92 टक्के व्यक्ती या मध्यम वयोगटातील असल्याचंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मेडागास्कर आणि केनिया सारख्या झपाट्याने औद्योगिकीकरण होणाऱ्या देशात प्रदुषणांमुळे प्रत्येक चार व्यक्तीमागे एकाचा मृत्यू होत आहे.