Kumbh Mela 2021 हरिद्वार येथे सुरु असणारा कुंभ मेळा मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरू शकतो. ही बाब लक्षात घेत आरोग्य अधिकारी ते थेट राजकीय नेतेमंडळींपर्यंत सर्वांनीच कुंभ मेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा का केला जात नाहीय, हा प्रश्न उपस्थित केला आहे. पण, आता मात्र साधुसंतांनीच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णय़ाचं सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. 


साधुसंतांच्या या निर्णय़ानुसार आता इथं मोठ्या स्वरुपात गर्दी उसळणार नसून विविध आखाड्यांचे प्रतिनिधीच गंगा स्नान करत कुंभ मेळा पूर्णत्वास नेणार आहेत. पुढील आणि शेवटचं शाही स्नान 27 एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आहे. हा दिवस अमृत योग मानला जात असल्यामुळं त्या दिवशी हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसणळण्याची शक्यता आहे. याआधी 21 एप्रिललाही एक शाही स्नान पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी कुंभ मेळ्यामध्ये 13 आखाडे सहभागी झाले आहेत. ज्यापैकी निरंजनी आणि आनंदी आखाड्यानं 17 एप्रिललाच कुंभ समाप्ती झाल्याचं जाहीर करत आपला तळ या ठिकाणहून हलवण्यास सुरुवात केली. आता याचंच अनुकरण इतर सर्व आखाडे करतात का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 






दरम्यान, देशात एकीकडे कोरोनाचा उद्रेक सुरु असताना हरिद्वारमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत कुंभमेळ्याचं आयोजन सुरु होतं. परिस्थिती पाहता, खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं. कोरोनाचा उद्रेक होत असतानाही प्रचंड गर्दीत साजरा होणाऱ्या कुंभमेळ्यावर अखेर पंतप्रधानांनी मौन सोडलं. कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करा, असं आवाहन मोदींनी केलंय. कुंभमेळ्याच्या आयोजनातले एक महत्वाचे संत आचार्य महामंडलेश्वर यांच्याशी पंतप्रधानांनी सकाळी फोनवरुन चर्चाही केली.


कुंभ मेळ्यातून परतणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचं 


कुंभ मेळ्यात मागील काही दिवसांत धडकी भरवणारी गर्दी पाहायला मिळाली. मुख्य म्हणजे या गर्दीत कोरोना आणखी फोफोवला आणि हजारो नवे कोरोनाबाधित तिथं आढळून आले. याच पार्श्वभूमीवर कुंभ मेळ्यातून रेल्वे आणि बसने परतणाऱ्या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येणार असून, यासाठीचा खर्च हा त्या व्यक्तींनाच करायचा आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.