harbhajan singh : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हरभजन सिंहला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर, हरभजन सिंह याला स्पोर्ट्स विद्यापीठात महत्वाचं पद देण्याची शक्यता आहे.


भगवत मान यांनी नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत आप पक्षाने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला होता. पंजाबमध्ये आप पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान, भगवत मान यांनी क्रीडा क्षेत्राला चालना देणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.


या महिन्याअखेर राज्यसभेत आम आदमी पक्षाचा पाच जागा मिळणार आहेत. त्यासाठी आप पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. यामध्ये पहिले नाव हरभजन सिंह याचे असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, हरभजन सिंह याच्या नावाला अरविंद केजरीवाल यांनीही दुजोरा दिला आहे. लवकरच अधिकृत याची घोषणा होणार आहे.


आपची घोडदौड सुरुच, शिवसेना-राष्ट्रवादीलाही टाकणार मागे - 
पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर केजरीवाल यांच्या आप पक्षाच्या राज्यसभेतील जागा वाढणार आहेत. राज्यसभेतील आप पक्षाचा दबदबा वाढणार आहे. सध्या आप पक्षाचे तीन राज्यसभा सदस्य आहेत. पंजाबमधील विजयानंतर यामध्ये आणखी सहा सदस्यांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेत सर्वाधिक खासदार असणाऱ्यांमध्ये आप पाचव्या क्रमांकावर पोहचणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (तीन राज्यसभा खासदार) आणि राष्ट्रवादीपेक्षाही (चार राज्यसभा खासदार) जास्त राज्यसभा खासदार आप पक्षाकडे होणार आहेत.  पंजाबमधल्या ऐतिहासिक विजयानंतर आम आदमी पक्षाचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान मजबूत होताना दिसतंय. पंजाबच्या विजयानं आपची राज्यसभेतली ताकद चांगलीच वाढणार आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या संख्येतही आपनं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाशी अल्पावधीत बरोबरी केलीय.  पंजाबमधील अकाली दल पक्षाचा राज्यसभेतील सुपडा साफ होणार आहे. अकाली दल पक्षाचा एकही खासदार राज्यसभेत राहणार नाही. तर बसपा पक्षाचा फक्त एक खासदार राहणार आहे. सध्या वायएसआरचे सहा खासदार, सपा आणि आरजेडी पक्षाचे पाच राज्यसभा खासदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आप पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या नऊवर जाणार आहे. पंजाबमधल्या दणदणीत विजयाचा पहिला बोनस आम आदमी पक्षाला पुढच्या 20 दिवसातच मिळणार. पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी 31 मार्चला निवडणूक होतेय.. यामधील चार जागा आप पक्षाच्या वाट्याला जाणार आहेत. यामध्ये थोडंसं गणित जुळवलं तर या पाचही जागा आप जिंकू शकतं.  तसेच चार जुलै रोजी पंजाबमधील आणखी दोन राज्यसभा जागा खाली होणार आहेत. या दोन्हीही जागा आप पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या पक्षाचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन किती झपाट्यानं वाढतंय याचंच हे निदर्शक म्हणावं लागेल.