हैदराबाद : हैदराबादमधील दोन प्रतिष्ठित घराण्यांची मैत्री लवकरच नात्यात बदलणार आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची कन्या आणि हैदराबादेतील बडे उद्योगक शाह आलम खान यांचा नातू विवाहबंधनात अडकणार आहेत.
खान आणि ओवेसी कुटुंबाचे वर्षानुवर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत. मात्र ओवेसींची कन्या कुदसिया आणि नवाब बरकत आलम खान यांच्या विवाहाने त्यांच्या नात्याचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. 28 डिसेंबरला कुदसिया आणि बरकत यांचा निकाह होईल.
ओवेसींनी हैदराबादेतील राजकारणाला नवा आयाम दिला आहे. तर दिवंगत शाह आलम खान यांचं नाव हैदराबादेतील उद्योगविश्वात अत्यंत मानाने घेतलं जातं. त्यांनी सुरु केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे अल्पसंख्याक समाजाला लाभ झाला.
गोळकोंडा सिगरेट फॅक्टरीची सुरुवात खान कुटुंबाने केली होती. शाह आलम खान यांचे पुत्र अहमद दुग्ध आणि वाटिका व्यवसाय पाहतात, तर महमूद आलम खान हैदराबादी पदार्थांचे मास्टरशेफ आहेत. नवरदेव बरकत यांनी मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून ते कुटुंबाचा व्यवसाय पाहतात.