नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. चित्रा रामकृष्ण यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु दिल्लीतील कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळत त्यांची रवानगी कोठडीत केली. न्यायालयाने त्यांना प्रार्थनापुस्तक, हनुमान चालिसा आणि भगवद्गीतेची प्रत बाळगण्याची परवानगी दिली आहे. परंतु घरचं जेवण आणि इतर सुविधांसाठी त्यांनी केलेली विनंती फेटळाली आहे.


चित्रा रामकृष्ण यांनी जामीनासाठी केलेल्या अर्जात म्हटलं होतं की, "सीबीआय यापुढे आपली कोठडी मागू शकत नाही." परंतु सीबीआयने याला विरोध केला आणि असा युक्तिवाद केला की, "त्या एक प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांच्या परदेश प्रवास आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास अद्याप सुरु आहे. म्हणूनच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी अशी आमची विनंती आहे." 


कोर्टाने चित्रा रामकृष्ण यांच्या न्यायालयीन कोठडीला परवानगी दिली आहे. परंतु घरचं जेवण आणि इतर सुविधांसाठी त्यांनी केलेली विनंती फेटळाली आहे. न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले की, "प्रत्येक कैदी समान असतो. चित्रा रामकृष्ण या ज्या पदावर होत्या, त्यामुळे त्या व्हीआयपी कैदी असू शकत नाहीत. नियम बदलता येत नाहीत." मात्र, न्यायालयाने त्याला प्रार्थनापुस्तक, हनुमान चालिसा आणि भगवद्गीतेची प्रत बाळगण्याची परवानगी दिली आहे.


दरम्यान, 'हिमालयन योगी' नावाच्या व्यक्तीला गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. 2013 पासून एनएसईचं नेतृत्त्व करणाऱ्या 59 वर्षीय चित्रा रामकृष्ण यांना बाजारात फेरफार आणि घोटाळा केल्यानंतर चौकशीअंती सीबीआयने अटक केली होती. 2018 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये काही दलालांना व्यवसायात गैरलाभ मिळाला होता. सीबीआय आता मार्केट एक्स्चेंजच्या कम्प्युटर सर्व्हरमधून स्टॉक ब्रोकर्सची माहिती लीक झाल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे.


दिल्लीतील स्टॉक ब्रोकरच्या विरोधात जवळपास चार वर्षांच्या तपासानंतर चित्रा रामकृष्ण यांना 6 मार्च रोजी सीबीआयने अटक केली होती. सेबीने राष्ट्रीय शेअर बाजारातील उच्च व्यवस्थापनाने अधिकाराचा गैरवापर केल्याचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर ही अटक करण्यात आली.


अहवालात असं नमूद केलं आहे की, रामकृष्ण यांना जवळजवळ 20 वर्षे वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींमध्ये रहस्यमयी 'हिमालयन योगी' यांचं मार्गदर्शन होतं. परंतु नंतर 'योगी' हा स्टॉक एक्स्चेंजचा माजी अधिकारी आनंद सुब्रमण्यम असल्याचं उघड झालं, ज्याला बाजारात घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.