नवी दिल्ली : पुढच्या वर्षी मार्च महिन्यात देशभरातील 50% एटीएम बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात तब्बल 2 लाख 38 हजार एटीएम  कार्यरत आहेत. त्यापैकी अर्धे एटीएम पुढच्या वर्षी बंद पडणार असल्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) याबाबत बुधवारी माहिती जाहीर केली.

सीएटीएमआयच्या म्हणण्यानुसार, "2 लाख 38 हजार एटीएमपैकी 1 लाख 13 हजार एटीएम बंद पडू शकतात. यामधल्या एक लाख एटीएम बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नाहीत. त्याला ऑफ साईट एटीएम म्हणतात. तर 15 हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम आहेत."

सीएटीएमआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लोकांना ज्या सवलती मिळतात, त्यामधून मिळणारे पैसे ग्रामीण भागातील लोक एटीएमच्या सहाय्याने मिळवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे मोठे नुकसान होऊ शकतं."