नवी दिल्ली : आपलं लग्न झालं आहे, असं युवक आणि युवती दोघंही सांगत असतील, तर लग्नाच्या वैधतेची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने हादिया आणि शफिनला दिलासा दिला आहे. मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे केरळच्या हादिया या तरुणीच्या पालकांनी केरळ हायकोर्टात धाव घेऊन दोघांचं लग्न रद्द करण्याची मागणी केली होती.


केरळच्या हादियाने शफिन जहाँ या मुस्लिम तरुणाशी लग्न केलं होतं. हे 'लव्ह जिहाद'चं प्रकरण असल्याचं सांगत ओमानहून परतलेल्या हादियाच्या पालकांनी केरळ हायकोर्टात धाव घेतली होती. हादियाचं लग्न रद्द करण्याची मागणी तिच्या पालकांनी केली होती.

गेल्या वर्षी हायकोर्टाने हादियाच्या पालकांच्या बाजूने निकाल दिला. मे महिन्यात केरळ हायकोर्टाने हादियाचं लग्न रद्द ठरवून तिला पालकांकडे जाण्याचे आदेश दिले होते.

हादियाचा पती शफिनने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हादिया सज्ञान असून तिला जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात या केसवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

'आपलं लग्न झालं आहे, असं युवक आणि युवती दोघंही सांगत असतील, तर चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीची चौकशी करु शकता, मात्र एखाद्याच्या लग्नाची वैधता किंवा मॅरिटल स्टेटसबाबत नाही. हे प्रकरण फौजदारी कारवाईच्या कक्षेत येता कामा नये. अन्यथा हे भविष्यात वाईट उदाहरण ठरेल.' असं चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सांगितलं.

'कोर्ट लग्न रद्द करु शकतं का, याचा आम्ही तपास करु शकतो. लग्न कायदेशीर आहे की नाही, यावर आम्ही प्रश्न उपस्थित करु शकत नाही. कोण चांगलं आहे आणि कोण वाईट हे हादिया ठरवेल' असं न्यायाधीशांनी सांगितलं. लव्ह जिहादच्या प्रकरणात एनआयए चौकशीचे आदेश मागे घेण्याबाबत कोर्टाने काहीही सांगितलेलं नाही.

हादियाचं ब्रेनवॉश करुन तिला धर्मांतराची जबरदस्ती करण्यात आली आहे, तिला सीरियाला नेण्यात येणार आहे, असा दावा तिच्या पालकांनी केला होता. नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने हादियाची तिच्या पालकांपासून सुटका केली होती. लग्नापूर्वी ती शिकत असलेल्या तामिळनाडूतील कॉलेजमध्ये शिक्षण सुरु ठेवण्याची परवानगी तिला देण्यात आली.