गुवाहटी : आसाम पोलिसांनी एका स्थानिक व्यापाऱ्याच्या घरातून 1.55 कोटी रुपये जप्त केले आहेत. यामध्ये पाचशे आणि 2000 हजारच्या नोटांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलिस महानिरिक्षक अनिल कुमार झा यांनी ही माहिती दिली.


हार्दी सिंह बेदी असं व्यापाऱ्याचं नाव आहे. या व्यापाऱ्याचं स्वतःचं हॉटेल असून शहरात त्याने काही गाळे भाड्याने दिले आहेत. त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात नव्या नोटांच्या स्वरुपात एक कोटी 54 लाख 81 हजार रुपये जप्त करण्यात आले, अशी माहिती अनिल कुमार झा यांनी दिली.

जप्त करण्यात आलेल्य रकमेत एक कोटी 54 लाख 6 हजार रुपये 2000 हजार रुपयांच्या नोटांमध्ये होते. तर 75 हजार रुपये पाचशेच्या नोटांमध्ये होते, असं झा यांनी सांगितलं. हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आलं असून ही रक्कम कुठून आली, याचा तपास चालू आहे.

यापूर्वी राजस्थानची राजधानी जयपूरमधून एका सहकारी बँकेतून 1.56 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात यामध्ये एक कोटी 38 लाख रुपये एवढी रक्कम आहे. नोटाबदलीमध्ये अनियमितता असल्याची तक्रार आल्याने आयकर विभागाकडून या बँकेवर छापा मारण्यात आला होता.