नवी दिल्ली : केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर चलनात 2000 च्या नोटा आणल्या. मात्र या नोटा पुढच्या 5 वर्षात बंद होतील, असं आरएसएस संबंधित सीए एस. गुरुमूर्ती यांचं म्हणणं आहे. तसेच आगामी काळात सरकार अडीचशे रुपयांची नोटही चलनात आणू शकते, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.


नोटाबंदीनंतर चलन तुटवडा टाळण्यासाठी 2000 ची नोट छापण्यात आली. मात्र येत्या 5 वर्षात ही नोट बंद करण्यात येईल.  भविष्यात 500 रुपये ही सर्वात मोठी नोट असेल, असं गुरुमूर्ती यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सरकारने 2000 ची नोट बंद केली तरीही 2000 च्या आतील सर्व नोटा चालतील. कारण सरकार छोट्या किंमतीच्या नोटांवर भर देणार आहे, असं गुरुमूर्ती यांनी म्हटलं आहे.

पाचशे आणि हजारची नोट बंद केल्यानंतर विरोधकांनी आणल्यानंतर 2000 हजारची नोट का चलनात आणली, असा सवाल केला होता. शिवाय बाजारात सध्या 2000 ची नोट उपलब्ध आहे. मात्र सुट्ट्या पैशांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.


दरम्यान, कालच्या मुलाखतीतील आपल्या वक्तव्यावरुन गुरुमूर्ती यांनी आज ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. मी या मुलाखतीत आणि इतरही कार्यक्रमांमध्ये 2000ची नोट ही गरजची असली, तरी ती घेऊन फिरणे तितके व्यवहार्य नसल्याचे सांगितले आहे. पण हे माझे वैयक्तिक मत असून, सरकारचा याच्याशी कसलाही संबंध नसल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तसेच त्यांनी यावेळी इतर ट्वीटमधूनही आपला वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत, माध्यमांवर सडकून टीका केली आहे. पत्रकाराला टीआरपी जर्नालिस्ट संबोधून, संबंधित चॅनेल विश्वासार्ह नसल्याचे म्हटले आहे.