नवी दिल्ली : दिल्लीजवळील गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्याची हत्या शाळेच्याच बस कंडक्टरने केल्याचं उघडकीस आलं आहे. लैंगिक शोषण करुन मुलाची गळा चिरुन हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.


पोलिसांनी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारला अटक केली आहे. याशिवाय बस चालक आणि शाळेच्या व्यवस्थापला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिस तपास करत आहेत.

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षांच्या प्रद्युम्न ठाकूरची शुक्रवारी सकाळी गळा चिरुन हत्या झाली. त्याचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला होता.

आरोपी कंडक्टर अशोकने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हत्येपूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. विरोध केल्याने आरोपीने त्याची हत्या केली.

आरोपी मागील आठ महिन्यांपासून शाळेत काम करत होता. निष्पाप मुलाच्या हत्या पूर्वनियोजितहोती, असं गुरुग्रामचे पोलिस उपायुक्त सिमरदीप सिंह यांनी सांगितलं.

15 मिनिटांतच प्रद्युम्नची हत्या
प्रद्युम्न सकाळी 7.55 वाजता शाळेत पोहोचल आणि सकाळी 8.10 वाजता शाळेकडून मुलाच्या वडिलांना फोन गेला की, त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. प्रद्युम्नच्या वडिलांनीच त्याला सकाळी 7.55 वाजता शाळेत सोडलं होतं.

वडील शाळेत पोहोचण्याआधीच प्रद्युम्नने प्राण सोडले होते. प्रद्युम्नची गळा चिरुन हत्या केली होती. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा
प्रद्युम्नच्या हत्येनंतर संतापलेल्या पालकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल आहे. शाळेचं व्यवस्थापन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. निष्पक्ष तपासासाठी शाळेविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.