हरियाणा : बलात्कारी बाबा राम रहीमच्या डेऱ्यावर आता छापे पडले आहेत. त्यामुळे त्यानं मारलेल्या थापाही आता त्याच्या अंगलट आल्या आहेत.


स्वतःला सुपरमॅन बनवण्यासाठी बाबानं वाट्टेल त्या कथा आपल्या नावावर खपवल्या. बाबा फक्त बाताच मारायचा नाही तर भक्तांसमोर असे काही व्हिडीओ प्रसिद्ध करायचा की भक्त पार पाघळून जायचा. त्यानं असाही दावा केला की आलिशान गाड्या खुद्द राम रहीमने डिझाईन केल्या आहेत.

बाबानं एक मोबाईल हॉस्पिटलही सुरु केलं आहे. त्याद्वारे आपण देवाचे अवतार आहोत, असा आव राम रहीम आणायचा.

कोणताही किस्सा बाबा असा काही तिखट मीठ लावून सांगायचा की भक्त गुंग व्हायचे. बाबाच्या फालतू दाव्यांनाही चमत्कार मानायचे. डोक्यातला मेंदू गहाण टाकलेल्या भक्तांच्या टकलावरही बाबानं जंगल उगवलं म्हणे. बाबाच्या एक भन्नाट शॅम्पू बनवल्याचाही दावा केला आहे.

बाबाच्या या थापा केवळ सत्संगापुरत्या नाहीत. तर खेळाच्या मैदानातही त्यानं थापा मारण्याचा विक्रम केला आहे. क्रिकेटमध्ये षटकार ऐकला होता पण बाबा क्रिकेटच्या मैदानात अठ्ठा मारत असल्याचा दावा करायचा. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा शोधही बाबानेच लावल्याची पुडी त्याच्या भक्तांनी सोडली होती म्हणे. क्रिकेटच्या मैदानातच नाही पण या महाभागानं बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधुलाही जमणार नाही, अशी कमाल केली आहे म्हणे.

म्हणजे क्रिकेटपासून कबड्डीपर्यंत आणि बॅडमिंटनपासून व्हॉलिबॉलपर्यंत प्रत्येक खेळात बाबाने थापा मारण्याचे विक्रम केले आहेत. इतकंच नाही तर बाबाने नव्या खेळाला जन्मही दिला आहे म्हणे.

मैदानच नाही तर बाबा किती कुटुंबवत्सल आहे याचंही मार्केटिंग होत असे. त्यामुळे बाबा कधी ब्रेड पकोडा तळताना दिसला तर कधी टोमॅटोचं साल सोलताना दिसला. महिलांसाठी घरगुती कामं करणारा सुपरमॅन तर पुरुषांसाठी शेतात राबणारा हीमॅन. असाच अवतार त्यानं धारण केला होता.

आता गोष्ट सिनेमाची... त्यात केले जाणारे स्पेशल इफेक्ट्स हे आपले चमत्कार असल्याच्याही बाता या महाभागानं मारल्या होत्या. एका फिल्ममध्ये तर बाबानं तब्बल 43 भूमिका केल्याचा दावा केला. गाणं तर बाबा 5 मिनिटात लिहित असे म्हणे.

पाच कोटी भक्तांचा देव अशी बाबाची इमेज. त्याच भक्तांसाठी बाबानं रहस्यमयी संसार उभा केला. जिथे थापांची शेती आणि बातांचं पिक उगवायचं. बाबा काहीही करु शकतो आणि भक्तांचं आयुष्य बदलू शकतो. हे भक्तांच्या मनावर बिंबवणं इतकाच अजेंडा. इतकी वर्षे थापांच्या शेतीतून बाबाने नोटांचं पीक उगवलं आणि भक्तांच्या हाती मात्र भिकेचा कटोरा आला.

संबंधित बातम्या :

बलात्कारी राम रहीमच्या डेऱ्यातून आतापर्यंत काय-काय सापडलं?