श्रीनगर: उरी हल्ल्यानंतर सुरु असलेल्या शोध मोहीमेदरम्यान आज सकाळी सीमेपासून जवळ असलेल्या बांदीपोरातील गुरेजमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला. या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनीच या गोळ्या झाडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काल रात्री उशीरापर्यंत सुरक्षा रक्षकांची शोध मोहीम सुरु होती. यानंतर आज सकाळी गोळ्यांचा आवाज ऐकू आला. सुरक्षा रक्षकांनी गुरेजमधील बगतोर या गावाला वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळ्या चालवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


गेल्या रविवारी उरीमधील सैन्याच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने यात 18 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाने भारत-पाक सीमेवरील लाईन ऑफ कंट्रोलची गस्त वाढवली. शिवाय उरीच्या आसपासच्या परिसरातही झाडाझडती सुरु आहे.

उरी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध अतिशय तणावपूर्ण स्थितीत आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद ही संघटना असल्याचे समोर आले होते. यानंतर अमेरिकासहित इतर देशांनीही पाकिस्तानला चांगलेच फटकारले. पण तरीही पाकिस्तान आपल्या कुकृत्ये कमी करण्याचे नाव घेत नाही आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी दहशतवादी  बुरहान वाणीला काश्मीर नेता संबोधून भारताच्या खोड्या काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी भारतीय सैन्याने हत्या केल्याचा आरोप केला.