उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 18 जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर 21 तारखेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी यूएनच्या व्यासपीठावरुन बोलताना, बुरहान वाणी या दहशतवाद्याचा उल्लेख काश्मीरी नेता म्हणून केला. तसेच काश्मीरी नेत्याला भारतीय लष्करानं ठार केलं, असाही आरोप केला. विशेष म्हणजे, काश्मीरला स्वतंत्र करणारच हे बोलायलाही ते यावेळी विसरले नव्हते. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा उघडा पाडतील, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 7.30 दरम्यान त्यांचं भाषण होणार आहे.
उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहे. त्यामुळे याचे पडसाद सर्वच व्यासपीठावरुन दिसून येत आहेत. शरीफ यांच्या या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोषाची लाट आहे. त्या असंतोषाला सुषमा स्वराज आज यूएनच्या व्यासपीठावर वाट मोकळी करुन देणार आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या बैठकीवेळीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुनही सुषमा स्वराज पाकिस्तानला काय प्रत्युत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या