जम्मू-काश्मीर : जम्मू-पठाणकोट मार्गावर असललेल्या 36 आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहाटे साडेचारपासून सुरु असलेल्या या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. लष्कराचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.


LIVE UPDATE :

  • तिसऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा, सर्च ऑपरेशन चालूच

  • जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख रउफ असगर या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड

  • भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद, सर्च ऑपरेशन चालूच

  • दहशतवादी हल्ल्यावर लष्कराकडून पहिली प्रतिक्रिया : या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.

  • 'सध्या ऑपरेशन सुरु आहे. ऑपरेशन जोवर संपत नाही तोवर काहीही सांगता येणार नाही. आमचं लष्कर आणि सुरक्षा दल मजबुतीने आपलं काम करत आहेत. भारताची मान आम्ही झुकवू देणार नाही. आमच्या शहीद जवानांचा आम्हाला अभिमान आहे.' अशी प्रतिक्रिया गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली

  • वैष्णो देवीमध्येही हायअलर्ट जारी

  • सुंजावा येथील ऑपरेशन लवकरात लवकर संपावं यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संना पाचारण करण्यात आलं आहे.

  • गेल्या सात तासापासून अतिरेक्यांचा धुमाकूळ सुरुच, अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

  • या संपूर्ण घटनेवर संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाची नजर आहे. तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांशीही बातचीत केली आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्या प्रकरणी एक मोठी माहिती दिली आहे. हा हल्ला केलेले सर्व दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात आता जोरदार कारवाई सुरु केली आहे.


जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी पहाटेच्या सुमारास ज्युनियर ऑफिसर्स राहत असलेल्या परिसरात घुसले आणि त्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यामुळे लष्करी जवानांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

आज (शनिवार) पहाटे 4.50 च्या दरम्यान अचानक गोळीबार सुरु झाला. यानंतर पोलिसांनाही अलर्ट जारी करण्यात आला. तसेच लष्कराने या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. सुंजावा ब्रिगेड परिसर या लष्करी तळामध्ये तब्बल 3 हजार जवान आहेत.

सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबल्याचं कळतं आहे. तसंच लष्कराकडून इतर अतिरेक्यांचा शोधही सध्या सुरु आहे. अफजल गुरुला फाशी दिल्याच्या घटनेला 9 फेब्रुवारीला 5 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे असा हल्ला होऊ शकतो याची सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिली होती.