नवी दिल्ली : न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यसभा आणि लोकसभेतील अनेक खासदारांची तशी मागणी आहे, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी विरोधीपक्ष नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.


न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली तर त्यांच्या कुटुंबालाही यातून न्याय मिळेल. या चौकशीसाठी 15 राजकीय पक्षांच्या 144 खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

गेल्यावेळी न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी अर्धवट राहिली होती. त्यामुळे यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दवे यांनी न्या. लोया यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी याप्रकरणी न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेला.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण

गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे