अहमदाबाद : गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये गुजरातच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.


अहमद पटेल यांची परीक्षा

बंडाच्या भीतीपोटी बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले काँग्रेसचे गुजरातमधले 44 आमदार पुन्हा गुजरातमध्ये परतले आहेत. या आमदारांना सध्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारांनी दगाफटका करू नये म्हणून काँग्रेसचा खटाटोप सुरू आहे.

पक्षाचे चाणक्य अशी ओळख असलेले अहमद पटेल यांना कोणत्याही परिस्थिती राज्यसभेवर पाठवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. यापुढे कोणताही आमदार फुटू नये म्हणून  आमदारांवर पक्षाची करडी नजर असणार आहे.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीचं गणित

गुजरातमध्ये होत असलेल्या राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस सोडून आलेले बलवंत सिंह निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गुजरातमधील आमदारांचं गणित

गुजरात विधानसभेत एकूण 182 आमदार आहेत. काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आता केवळ 176 आमदार उरले आहेत. मात्र भाजपने इतर आमदारांच्या पाठिंब्याने बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसकडे सध्या असलेल्या 51 आमदारांच्या पाठिंब्यावर अहमद पटेल यांचा विजय निश्चित पाहिजे, मात्र काँग्रेसच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. कारण बंगळुरुमध्ये ठेवलेल्या 44 आमदारांचाच पक्षाला पाठिंबा असल्याची माहिती आहे.

वाघेला गटाच्या आमदारांचं समर्थन कुणाला?

गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे. सध्या काँग्रेसमध्ये वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत. मात्र हे आमदार कुणाला मतदान करणार याबाबत मोठा सस्पेंस आहे. हे आमदार अहमद पटेल यांनाच मतदान करतील, असा दावा काँग्रेसने केला आहे.

वाघेला यांनी याबाबत अजून काहीही भाष्य केलेलं नाही. हे आमदार एकतर भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा 'नोटा'चा पर्याय निवडू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. मात्र बलवंत सिंह यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराजी असल्यामुळे वाघेला गटाचे आमदार बलवंत सिंह यांनाच मतदान करतील, असंही बोललं जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भाजपला पाठिंबा देणार

काँग्रेसचे गुजरातमधील सहा आमदार भाजपने फोडल्यानंतर अहमद पटेल यांची सारी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, ऐनवेळी भूमिका बदलून राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं पटेलांची वाट आणखी बिकट झाली आहे.

राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये दोन आमदार आहेत. आज संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीने याबाबत कोणताही व्हीप जारी केला नव्हता. पण मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना राष्ट्रवादीनं काँग्रेसला मोठा धक्का दिला.

भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपनं अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे.

भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराकडे केवळ 31 मतं

भाजपचे बलवंत सिंह हे पक्षाचे तिसरे उमेदवार आहेत. आकडेवारीनुसार त्यांच्याकडे केवळ 31 मतं आहेत. मात्र बाहेरच्या आमदारांच्या पाठिंब्याने भाजपने बलवंत सिंह यांच्या विजयाचा दावा केला आहे.

गुजरातमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचा एक आमदार आहे. सद्यपरिस्थिती पाहता जेडीयूचा आमदारही भाजपला पाठिंबा देईल, असं बोललं जात आहे. मात्र गुजरातमधील जेडीयू आमदार शरद यादव गटाचा आहे. त्यामुळे त्याचा पाठिंबा अहमद पटेल यांना असेल, असाही दुसरा अंदाज लावला जात आहे.