गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीत 150 जागा मिळविण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजपनं आपला 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या तब्बल 25 ते 30 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
'पंतप्रधान मोदी हे आमचे सर्वात मोठे नेते आहेत. ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता ते देशाचे पंतप्रधान आहेत. फक्त गुजरातच नाही तर देशात आणि जगातही त्यांच्या नेतृत्वाची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वातील विकासकामं लोकं निश्चितच लक्षात ठेवतील.' असं गुजरात भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याचं मत आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो यामुळे थेट लोकांशी संपर्क साधता येणार असल्याचंही या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. 182 जागा असलेल्या गुजरातमध्ये मोदीं अनेक सभा घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात त्याचं संपूर्ण वेळापत्रकही तयार करण्यात येणार आहे.
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतरच खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर चढणार आहे. म्हणून त्यानंतरच मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे.
यासोबतच भाजपनं 'गुजरात गौरव महासंपर्क अभियान' सुरु केलं आहे. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलं आहे. तसंच अनेक केंद्रीय मंत्री देखील गुजरातमध्ये प्रचारासाठी उतरवण्यात आले आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, आरोग्य मंत्री जे. पी नड्डा, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह रामविलास पासवान, पुरषोत्तम रुपाला आणि मनसुख मंडाविया यांचा समावेश आहे.
याशिवाय भाजपनं सोशल मीडियावर देखील प्रचार सुरु केला आहे. "मोदी छे ने गुजरात सेफ छे ", " मैं हूं विकास, मैं हूं गुजरात " यासारख्या घोषणांनी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी गेल्या आठ महिन्यात 10 वेळा गुजरात दौरा केला आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा हे देखील गुजरातच्या प्रचारावर जातीनं लक्ष ठेऊन आहेत. अमित शाहा यांनी 4 ते 9 नोव्हेंबरदरम्यान गुजरातचा दौरा केला होता. या दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी गुजरातमधील वेगवेगळ्या भागाला भेट दिली होती. तसेच अनेक लोकांच्या थेट घरी जाऊनही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे भाजपनं गुजरातमध्ये यंदा बराच जोर लावला आहे.
भाजपला यंदा काँग्रेसशिवाय पाटीदार आंदोलनचा नेता हार्दिक पटेल यांच्याशिवाय ओबीसी नेते अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी या तिघांचा सामना करावा लागणार आहे.
फक्त भाजपचा विरोध या एकाच मुद्द्यावर हे सगळे एकत्र आले आहेत. त्यामुळे हे लोकं कधीही यशस्वी होऊ शकत नाही. असा दावा एका भाजप नेत्यानं केला आहे.
दरम्यान, गुजरातमधील सध्याची स्थिती पाहता भाजपनं वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवणं सुरु केलं आहे. त्यामुळे आता भाजप या निवडणुकीत कितीपत यश मिळवणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
गुजरातमध्ये 182 विधानसभेच्या जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून मतमोजणी 18 डिसेंबरला होणार आहे.