अलाहाबाद : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे प्रयत्न करत आहेत. मात्र, श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नांना साधू-संतांची सर्वात मोठी संघटना असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने ‘नौटंकी’ म्हटले आहे.


“श्री श्री रविशंकर ना आध्यात्मिक गुरु आहेत, ना संत-महात्मा आहेत. अयोध्या प्रकरणात ते नौटंकी करत असून, ते आपल्या संस्थेचा प्रचार करत आहेत.”, अशा शब्दात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी टीका केली. ते अलाहाबादमध्ये बोलत होते.

शिवाय, “श्री श्री रविशंकर हे मोठे व्यावसायिक आहेत आणि ते आपला व्यावसाय वाढवण्यासाठी पब्लिसिटी स्टंट करत राहतात. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच अयोध्याचा वाद सुटण्यापेक्षा आणखी वाढू शकतो.”, असेही महंत नरेंद्र गिरी म्हणाले.

श्री श्री रविशंकर यांच्या पुढाकारातून काहीच होणार नाही. त्यांच्या चर्चांमुळे कुणीच तयार होणार नाही. ते केवळ स्थिती खराब करु पाहत आहेत, असे महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले.

श्री श्री रविशंकर – योगी आदित्यनाथ भेट

दरम्यान, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे उद्या श्री श्री रविशंकर अयोध्येलाही भेट देणार आहेत. तर तिकडे अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी शिया वक्फ बोर्डानं सहमती दाखवली आहे.

दरम्यान अयोध्या वादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 5 डिसेंबरपासून अयोध्या वादावर तीन न्यायधीशांच्या खंडपीठाकडून सुनावणी सुरु होणार आहे.