Valsad Fire : गुजरातच्या (Gujarat) वलसाड (Valsad) जिल्ह्यातील सरिगाम जीआयडीसीमधील कारखान्यात सोमवारी (27 फेब्रुवारी) रात्री भीषण स्फोट झाला. सरिगाम G.I.D.C. वेन पेट्रोकेम अँड फार्मा (इंडिया) प्रा. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट (Boiler Explosion) झाल्याने कंपनीला भीषण आग लागली. शिवाय बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की तीन मजली कंपनी कोसळली. कंपनीची तीन मजली इमारत कोसळल्याने (Building Collapse) दोन जण जखमी झाले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्य सुरु केले. दरम्यान भिलाड पोलिसांच्या (Bhilad Police) ताफ्यानेही घटनास्थळी पोहोचून लोकांची गर्दी बाजूला करुन बचाव कार्य (Rescue Operation) सुरु केलं.
स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट
पालघर (Palghar) जिल्ह्याजवळच्या वलसाड तालुक्यातील सरिगाम जीआयडीसीमधील (Sarigam GIDC) कंपनीत रात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कंपनीत बॉयलरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीची तीन मजली इमारत कोसळली. पहाटे चार वाजेपर्यंत ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय या स्फोटाचं कारण देखील अजून अस्पष्ट आहे. बचाव कार्य अजूनही सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी वलसाडच्या उमरगाम जीआयडीसीमध्ये आग
याआधी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वलसाडच्याच उमरगाम जीआयडीसीमध्ये (Umargam GIDC) आगीची घटना घडली होती. 4 फेब्रुवारी रोजी एका मेटल कंपनीत (Metal Company) ही आग लागली होती. आगीच्या ज्वाळांनी आणि धुराच्य लोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.