Gujarat Morbi Bridge Collapse : मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यानं (Morbi Bridge Collapse) आतापर्यंत 140 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचीच आहे. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर तब्बल 300 ते 400 जण उपस्थित होते. पूल कोसळल्यानं शेकडो लोक नदीत बुडाले आहेत. अशातच यासंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. गुजरातमधील (Gujrat News) खासदार मोहन कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांचे तब्बल 12 नाकेवाईक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असून बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे.
दुर्घटनेच्या वेळी महिला आणि लहान मुलं उपस्थित होती
अपघाताबाबत बोलताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अपघात झाला तेव्हा पुलावर अनेक महिला आणि लहान मुलं उपस्थित होती. नदीत सुमारे 100 लोक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या दिवशीच हा पूल जनतेसाठी खुला करण्यात आला होता. पूल कोसळला त्यावेळी जीव वाचवण्यासाठी लोक तारांवर लटकत होते.
मोरबीच्या या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मोरबी येथील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेनं खूप दुःख झालं आहे. यंत्रणेकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींवर तातडीनं उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे."
दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50 हजाराची मदत घोषित करण्यात आली आहे.
...म्हणून घडली दुर्घटना, प्रत्यक्षदर्शींचा दावा
एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, काही तरुण पुलावर पाय मारत होते. काही तरुणांनी झुलता पूल तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही तरुण पुलावर पाय आपटताना दिसत आहेत. पोलीस त्या तरुणांचाही शोध घेत असल्याची माहिती आहे
दरम्यान, गुजरातमधील (Gujrat News) मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुमारे 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :