Asaram Bapu News: अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात (Rape) आधीपासूनच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) गुजरातच्या गांधीनगर (Gandhinagar) कोर्टाने सोमवारी (30 जानेवारी) दोन बहिणींवरील अत्याचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. गांधीनगर सत्र न्यायालयानं आसाराम बापूला 2013 मध्ये सुरतमधील (Surat) दोन बहिणींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं आहे. दरम्यान, आसाराम बापूचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता. त्यालाही काही दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. परंतु, या सर्वांची गांधीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. त्याच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचं अल्पवयीनं मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं.
दोन बहिणींनी केला बलात्काराचा आरोप
सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं लहान बहिणीनं सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीनं तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामनं तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितलं. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.
आसाराम जोधपूरच्या तुरुंगात
स्वयंघोषित संत आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. 2018 मध्ये, जोधपूर न्यायालयानं आसारामला दुसऱ्या एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. त्यावेळी जोधपूर न्यायालयानं आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
10 वर्षांपासून तुरुंगवास भोगतोय आसाराम
तुरुंगात असलेल्या आसाराम बापूनं नुकताच न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जात आसारामनं म्हटलं होतं की, आपण गेल्या 10 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. तो गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याच्या जामीन अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला योग्य उपचार मिळावेत म्हणून जामीन देण्याचे आदेश द्यावेत.
आसारामच्या मुलीच्या हाती आश्रमाचा कारभार
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत असल्याचे वृत्त होते. 'संत श्री आसारामजी ट्रस्ट'ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचं मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती.