मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून जवळपास 59 टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 182 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी पार पडलं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 63 टक्के मतदान झालं होतं.
गुजरात विधानसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान पार पडलं. यामध्ये बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर यांचा समावेश आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी 5 वाजता संपलं असून आतापर्यंत 58.68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज झालेल्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 833 उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत. यामध्ये 285 अपक्षांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी भाजप आणि आप सर्वच म्हणजे 93 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसने 90 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने 44 उमेदवार उभे केले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकूर निवडणूक लढवत आहेत. जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील जेतपूरमधून उमेदवार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तक्रार
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदान केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कायदेशीर कक्षाचे अध्यक्ष योगेश रवाणी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाजपचा झेंडा घेऊन आणि भगवा स्कार्फ परिधान केलेले मोदी राणीप येथील मतदान केंद्रापासून 500 ते 600 मीटर अंतरावर रोड शो केला आणि हा आचारसंहितेचा भंग आहे.