Crime News: महिलांच्या विनयभंगाप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. या आरोपीने किमान 100 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. इतकंच नव्हे तर हा आरोपी राज्यस्तरीय कुस्तीपटू आहे. एका योग शिक्षिकेच्या तक्रारीनंतर राजकोट पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतरही माहिती समोर आली.


कौशल पिपालिया असे या आरोपीचे नाव आहे. त्याने 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये 74 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. योग शिक्षिकेचा विनयभंग केल्यानंतर आरोपी 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. 


'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, विनयभंग प्रकरणी पीडितेने मालवीयनगर पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, पीडितेने दुचाकी पार्क केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी एक व्यक्ती बसली होती. दुचाकी पार्क केल्यानंतर लिफ्टने वरील मजल्यावर जात असताना ही व्यक्ती अचानकपणे लिफ्टसमोर आली आणि दरवाजा अडवला. त्यानंतर या व्यक्तिने पँट काढून तिच्याकडे पाहत अश्लील हावभाव केले. त्यावेळी पीडित तक्रारदार महिलेने त्याला फटकारत लिफ्ट बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपीने महिलेच्या कानशिलात लगावत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारामुळे धास्तावलेल्या महिलेने आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढला. 


मालवीयनगरचे पोलिस निरीक्षक आय. एन. सावलिया म्हणाले, "आरोपी पिपलियाने सुमारे 100 महिलांचा विनयभंग केल्याचे कबूल केले आहे. या कृत्यामुळे त्याला विकृत आनंद मिळत होता. त्याच्याविरोधात पीडित महिलांनी तक्रार करणे टाळले असल्याचेही त्यांनी म्हटले. आरोपी पिपलिया हा बाईक चालवताना महिलांच्या कानशिलात लगावत पळ काढण्यासाठी कुप्रसिद्ध असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याआधी देखील त्याला चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत अटक करण्यात आली होती. 


आरोपी हा युनिव्हर्सिटी रोड, अमीन मार्ग, कोटेचा चौक, कलावाड रोड, निर्मला रोड, अ‍ॅस्ट्रॉन सोसायटी, पंचवटी सोसायटी आदी भागात महिलांसमोर, विशेषतः तरुणींसमोर अश्लील हावभाव करत फिरत असायचे असे पोलिसांनी सांगितले. 


आरोपीकडून मास्कचा वापर, तरीही पोलिसांनी केले जेरबंद


महिलांचा विनयभंग करताना आपली ओळख झाकण्यासाठी नेहमी  फेस मास्कचा वापर करायचा. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले होते. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. पोलिसांनी घटनास्थळाजवळील कॅमेऱ्यांशिवाय, शॉपिंग मॉल, दुकाने, उच्चभ्रू वस्तींसह सार्वजनिक ठिकाणी असलेले 1500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्या दरम्यान एका संशयिताने मास्क घातला असल्याचे दिसून आले. सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये संशयित भक्तीनगर येथील देवपारा सोसायटीजवळ अनेकदा दिसला होता. पोलिसांनी या भागातील जवळपासच्या सोसायटीमध्ये चौकशी सुरू केली. त्यावेळी जवळच्या विवेकानंद सोसायटीत राहणारा आरोपी आढळून आला.