गांधीनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने गुजरात सेंट्रल यूनिव्हर्सिटीने 9 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या एका कार्यक्रमात हे नऊ प्राध्यापक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपविरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते.


प्राध्यापक असूनही तुम्ही राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात का उपस्थित राहिलात? असा प्रश्न विचारत यूनिव्हर्सिटीने या नऊ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

गुजरातमधील या प्राध्यापकांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीवर काँग्रेसच्या गोटातून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राहुल गांधींची अध्यक्षपदानंतर पहिलीच जाहीर सभा

दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेणार आहेत. 29 एप्रिल रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात ‘जन आक्रोश रॅली’तून राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.