अहमदाबाद : गेल्या महिन्यात बडोद्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान त्यांच्याकडे बांगड्या फेकल्याचा आरोप असणारी महिला काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. निलंबित प्राथमिक शाळेच्या शिक्षिका चंद्रिका सोलंकी यांना गुजरात विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.


चंद्रिका सोलंकी कंत्राटी आणि कायमस्वरुपी वेतन संघर्ष समितीच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आहेत. या संघटनेने गुजरातमधील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी लढा दिला होता. आपण काँग्रेसच्या संपर्कात असून बडोद्यातील शाहरवाडी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा असल्याचं सोलंकी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.

निवडणूक लढण्यासाठी शिक्षिकेची नोकरी सोडली आहे. काँग्रेसच्या निरिक्षकांनीही भेट घेतली, असंही सोलंकी यांनी सांगितलं.

दरम्यान चंद्रिका यांनी हा दावा केल्यानंतर एबीपी न्यूजने काँग्रेसचे बडोद्याचे अध्यक्ष प्रशांत पटेल यांच्याशी बातचित केली. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. चंद्रिका सोलंकी यांनी तिकिटासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीला नव्हे, तर प्रदेश काँग्रेस कमिटीशी संपर्क साधला आहे, असं प्रशांत पटेल यांनी सांगितलं. बडोद्यात दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या व्यासपीठावर चंद्रिकाही दिसल्या होत्या.

कोण आहेत चंद्रिका सोलंकी?

चंद्रिका यांनी बडोद्यात 22 ऑक्टोबर रोजी मोदींच्या रोड शो दरम्यान बांगड्या फेकल्याचा आरोप आहे. चंद्रिका यांनी यापूर्वी वेतनाच्या प्रश्नावर 40 दिवस उपोषण केलं होतं. कंत्राटी कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आणि 108 रुग्णवाहिकेच्या कार्मचाऱ्यांसाठी त्यांनी यापूर्वी आंदोलन केलं आहे. आशा वर्कर्ससोबत त्यांनी मे महिन्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.