भरुच : गुजरातमधील गेल्या 22 वर्षाची विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भरुचमध्ये सभा घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.  “जे उत्तर प्रदेशात झालं, त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्येही होईल,” असा विश्वास व्यक्त केला.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, “उत्तर प्रदेशात काँग्रेसने अनेक दशकं राज्य केलं. पण आज आपण पाहतो की, उत्तर प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची काय स्थिती झाली. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील जनतेला हे नक्की माहिती आहे की, काँग्रेसचं यावेळीही काय होणार आहे?”

मोदी पुढे म्हणाले की, “विकास कसा होऊ शकतो, हे गुजरातने करुन दाखवलं. काँग्रेसच्या काळात अहमद पटेल सत्तेच्या केंद्रस्थानी होते. पण तरीही भरुचचा विकास होऊ शकला नाही. भाजपचा एकच मंत्र आहे. आणि तो म्हणजे विकास आणि फक्त विकास.”

बुलेट ट्रेनवरुनही मोदींनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “काँग्रेस काहीच करु शकली नाही. आणि आम्ही बुलेट ट्रेन घेऊन आलो. ज्यांना बुलेट ट्रेनचा त्रास होतो, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. वास्तविक, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांनाच रोजगार मिळणार आहे.”

मोदी म्हणाले की, “काँग्रेस गुजरातमध्ये भावा-भावात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीने देशाच्या 70 वर्षांचं वाटोळं केलं. भाजपच्या काळातच भरुच आणि कच्छमध्ये सर्वाधिक विकास झाला. इथल्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वादचं माझी ताकद आहे.”