नवी दिल्ली : 2016 मध्ये देशात तब्बल 1 लाख 51 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यापैकी 80 टक्के मृत्यू हे चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषणने देशभरात वर्षभरातील रस्ते अपघातांच्या तक्रारीवरुन ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 1 लाख 51 हजार जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागल्याचं नमुद करण्यात आलं आहे. यापैकी 80 टक्के मृत्यू हे चालकाच्या चुकीमुळे झाल्याचं म्हटलं आहे.

पण अपघाती मृत्यूंना इतक्या मोठ्या प्रमाणात चालकांना जबाबदार धरण्यावर वाहतूक सुरक्षा तज्ञ्जांनी आक्षेप घेतला आहे. अशा अपघातांची तपासणी होताना इतर कारणांचा बारकाईने तपास केला जात नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

कारण असे अपघात होण्यामागे रस्त्यांची स्थिती, खड्डे, या गोष्टींचाही गांभीर्यानं विचार व्हायला हवा, असं या तज्ञ्जांना वाटतं. जेणेकरुन भविष्यात अपघातातील मृतांचा हा लाखातला आकडा कमी होईल.

दरम्यान, 2015 मध्ये 1 लाख 49 हजार जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. यातील 1 लाख 34 हजार जणांचा मृत्यू बेजाबदारपणे गाडी चालवणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करण्यामुळे झाल्याचं समोर आलं होतं.