गांधीनगर : गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील कालोल जागेसाठी सुरु असलेला कौटुंबिक ड्रामा अखेर संपला आहे. भाजप खासदार प्रभात चौहान पत्नी रंगेश्वरी देवी आणि सून सुमन चौहान एकाच मंचावर आल्या. यावेळी 35 वर्षीय सासून 50 वर्षीय सुनेला आशीर्वादही दिला.
भाजपने कालोल जागेसाठी खासदार प्रभात चौहान यांची सून सुमन चौहान यांना तिकीट दिलं. मात्र सासू रंगेश्वरी देवी यांनी सुमन यांच्या उमेदवारीला विरोध केला. रंगेश्वरी यांनी सुमन यांच्याविरोधात प्रचार करण्याची धमकीही दिली होती.
रंगेश्वरी देवी ह्या प्रभात चौहान यांची चौथ्या पत्नी आहेत, तर सुमन चौहान ह्या प्रभात चौहान यांची पहिली पत्नी रुपारी बेन यांच्या मुलाची पत्नी आहेत.
रंगेश्वरी यांच्यासोबत खासदार प्रभात चौहान यांनीही मुलाची पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून तक्रार केली होती. पण आता हा विरोध मावळला असून कुटुंब एकत्र होऊन निवडणूक लढत आहे. आता संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचा दावा केला जात आहे.
राजकीय संदेश देण्यासाठी सासू आणि सुनेचा वाद भलेही संपला असेल, पण मंचावर सासू आणि सुनेमध्ये दुरावा दिसला. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये चष्मा लावलेली 35 वर्षीय सासू रंगेश्वरी देवी तर 50 वर्षीय सून आणि भाजप उमेदवार सुमन चौहान या वेगवेगळ्या सोफ्यावर तसंच एकमेकींपासून दूर बसलेल्या दिसल्या.
यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमरही उपस्थित होते. सगळ्यांनी भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं.
सभेनंतर संपूर्ण कुटुंब उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले. खासदार महोदय खुल्या जिप्सीमध्ये बसून मोठ्या ताफ्यासह सून सुमन चौहान यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सोबत निघाले. या जिप्सीवर खासदार प्रभात चौहान, भाजच्या उमेदवार आणि त्यांच्या सून सुमन चौहान, सुमन यांचे पती प्रवीण चौहान पुढे उभे होते. पण सुमन यांची सासू रंगेश्वरी देवी जिप्सीमध्ये मागे उभ्या होत्या. प्रभात चौहान सुरुवातीला पुढे होते, थोड्या वेळाने ते पत्नी रंगेश्वरीसोबत मागे बसले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. खासदार प्रभात चौहान म्हणाले की, संपूर्ण कुटुंब एकत्र आहे आणि दीड लाख मतांनी विजयी होऊ, अशी अपेक्षा प्रभात चौहान यांनी व्यक्त केली.
प्रभात चौहान यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यावर एक नजर
- 78 वर्षीय प्रभात चौहान पंचमहल मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनले आहेत. खासदार महोदयांनी चार लग्न केली आहेत.
- पहिली पत्नी रुपारी देवी यांच्यापासून त्यांना चार मुलं आणि दोन मुली आहेत. रुपारी बेन यांचा मुलगा प्रवीण चौहान यांच्या पत्नी सुमन चौहान यांना कालोल जागेसाठी भाजपने तिकीट दिलं आहे, ज्याला विरोध सुरु होता.
- दुसरी पत्नी रमीला बेन, ज्या कालोलजवळच मेहलोलमध्ये राहतात. रमीला बेन यांच्यापासून प्रभात चौहान यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
- तिसरी पत्नी लीला बेन आहे. लीला बेन यांच्यापासून प्रभात चौहान यांना एक मुलगी आहे. त्या गांधीनगरमध्ये राहतात.
- तर चौथी पत्नी आहे रंगेश्वरी देवी, यांच्यापासून प्रभात चौहान यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. जो गांधीनगरमध्ये चौथी इयत्तेत शिकतो. प्रभात चौहान यांनी 2009 मध्ये रंगेश्वरी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा असल्याचं समोर आलं होतं. तेव्हा या मुलाचं वय एक वर्ष होतं. रंगेश्वरी घोगम्बा तालुकामधून पंचायत प्रमुख आहेत.
गुजरात निवडणुकीत 35 वर्षीय सासूचा 50 वर्षांच्या सुनेला पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Nov 2017 01:02 PM (IST)
भाजपने कालोल जागेसाठी खासदार प्रभात चौहान यांची सून सुमन चौहान यांना तिकीट दिलं. मात्र सासू रंगेश्वरी देवी यांनी सुमन यांच्या उमेदवारीला विरोध केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -