Gujarat Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने (Gujarat Air India Plane Crash) संपूर्ण देश हादरला. लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही मिनिटांमध्येच भीषण अपघात झाला, यात 275 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळल्याचं समोर आलं आहे.
एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना इंधनपुरवठा ठप्प झाल्यानं झाल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात म्हटलं आहे. उड्डाणानंतर तीन सेकंदांतच दोन्ही इंजिनचा इंधनपुरवठा ठप्प झाला. तसेच इंधनपुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवादही समोर आला आहे. इंधन पुरवठा का बंद केला? असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिले. इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर 29 व्या सेकंदांस एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यामुळे 2018 च्या एफएएच्या मार्गदर्शिकांकडे एअर इंडियाचं दुर्लक्ष झाल्याचं समोर येत आहे.
डीजीसीएने एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे दिले आदेश-
21 जून रोजी डीजीसीएने एअर इंडियाला 3 अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, क्रू शेड्युलिंग करणारी मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनात सहभागी असलेली पायल अरोरा यांचा समावेश होता. विमान सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
नेमकी घटना काय?
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.