Gujarat Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जूनला एअर इंडियाच्या विमान अपघाताने (Gujarat Air India Plane Crash) संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात 265 हून अधिक लोकांना आपला जीव गमवाला लागलाय. तर अनेक लोक जखमी झाले आहे. सध्या या विमान दुर्घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताचं भीषण रूप एका व्हिडीओमुळे समोर आलं. अपघातग्रस्त एआय 171 या विमानाने उड्डाण केल्यावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत उड्डाणानंतर विमान खाली कोसळताना दिसलं. या व्हिडीओनंतर जगभरात या अपघातासंबंधी तर्कवितर्क केले जाऊ लागले. मात्र हा व्हिडीओ आर्यन नावाच्या मुलाने काढला. एबीपी माझाने आर्यनसोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने नेमकं काय घडलं?, याबाबत माहिती सांगितली.
कधी विमान बघितले नव्हते, मी व्हिडीओ काढला अन्...
विमान अपघाताचा व्हिडीओ काढणारा आर्यनने सांगितले की, मी गावात राहतो. अहमदाबादमध्ये राहत नाही. मी कधी विमान बघितले नव्हते. सध्या मी अहमदाबादमध्ये आलो होतो. यावेळी इमारतीच्या टेरेसवर आल्यानंतर विमान उडताना पाहिले. त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. परंतु थोड्याच वेळाने विमानाचा अपघात झाल्याने मी घाबरून गेलो. हे नेमकं काय झालंय?, हे मला समजलं नाही, असं आर्यनने एबीपी माझाशी बोलताना म्हणाला.
विमान अपघाताचा सहापेक्षा अधिक यंत्रणांकडून तपास सुरु-
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सहापेक्षा अधिक यंत्रणांकडून तपास सुरु आहे. डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएसकडून कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच सदर विमान दुर्घटनेबाबत एनआयएने घातपाताची शक्यता फेटाळली आहे. ब्लॅक बॉक्स, डीव्हीडीआर डेटाचं फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण करण्यात येत आहे. एनएसजीची टीम आजही करणार घटनास्थळी तपास करत आहेत. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीकडून तपास सुरु असून विद्यमान नियमावलीसह भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने तपास केला जातोय. तसेच केंद्रीय गृहसचिवांची समिती लवकरच घटनास्थळी भेट देणार आहेत.