Gujarat Air India Airplane Crash: अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये (Gujarat Air India Airplane Crash) मुंबईतील गोरेगावमधील अली कुटुंबावर काळाचा घाला झाला. या विमान दुर्घटनेत जावेद अली (Javed Ali) यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. अली कुटुंब आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईत आले होते आणि ते लंडनला परतताना हा अपघात झाला.
अहमदाबादच्या कसोटी भवन या ठिकाणी जिथे डीएनए टेस्ट प्रक्रिया पार पडते, तिथे मृतांच्या नातेवाईकांकडून संयम सुटताना पाहायला मिळतोय. विमान दुर्घटनेला 40 तास घटनेला होऊन गेले. मात्र अजूनही अपघातामध्ये मृत झालेल्या प्रवाशांच्या मृतदेहाबद्दल रुग्णालय प्रशासनाकडून माहिती दिली जात नाहीय. शिवाय मृतदेहांची ओळख पटत नाहीय, असा आरोप जावेद अली यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आमच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत?, असा सवाल जावेद अली यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलाय. जावेद अली यांच्या कुटुंबीयांसोबत एबीपी माझाने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध सवाल उपस्थित केले.
जावेद अली यांचे कुटुंबीय काय म्हणाले?
आमच्या दोन आणि चार वर्षांच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत हे दाखवा?, असं जावेद अली यांची मामी म्हणाली. दोन दिवसापासून आम्ही फेऱ्या मारत आहोत. पण आम्हाला काही सांगितलं जात नाही. ते लहान होते, म्हणून ते मिळणं अवघड आहे, असं रुग्णालय प्रशासन म्हणतंय. पण त्यांचं काहीतरी अवशेष असेल जेणेकरून आम्हाला लहान मुलं आहेत हे समजेल आणि मनाला शांती मिळेल, असं जावेद अली यांची मामी म्हणाली.
जावेद आली 12 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास-
गोरेगावचे जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन लहानग्या मुलांनी विमान अपघातात जीव गमावला आहे. जावेद अली हे गेल्या 12 वर्षापासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. जावेद अली यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने, तिची भेट घेण्यासाठी ते कुटुंबासह 7 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आले होते आणि 12 जून रोजी पुन्हा लंडनला जात होते. मात्र त्याचवेळी विमान अपघात झाला आणि जावेद अली यांच्यासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
विमान अपघातामध्ये महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू-
एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 16 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे.