Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा (Gujarat Air India Plane Crash) अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून तपास सुरु आहे. डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएसकडून कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच सदर विमान दुर्घटनेबाबत एनआयएने घातपाताची शक्यता फेटाळली आहे.
ब्लॅक बॉक्स, डीव्हीडीआर डेटाचं फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण करण्यात येत आहे. एनएसजीची टीम आजही करणार घटनास्थळी तपास करत आहेत. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीकडून तपास सुरु असून विद्यमान नियमावलीसह भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने तपास केला जातोय. तसेच केंद्रीय गृहसचिवांची समिती लवकरच घटनास्थळी भेट देणार आहेत.
अहमदाबाद विमान अपघातानंतर नागरी उड्डाण नियामक संस्था अर्थात DGCAनं बोईंग 787-8 आणि 787-9 या श्रेणीतील सर्व विमानांच्या अतिरिक्त देखभाल आणि तपासणीचे आदेश दिले आहेत. उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची सात निकषांवर तपासणी करणं बंधनकारक असणार आहे. इंधन किती उरलंय हे दाखवणारी यंत्रणा, केबिन एअर काँप्रेसर आणि संबंधित यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिमसह एकूण आठ निकषांची तपासणी करावी लागणार आहे, तसंच या तपासणीचं निरीक्षण DGCAकडे पाठवावं लागणार आहे. 15 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
बोईंग विमानांसंदर्भात डीजीसीएने घेतले महत्वाचे निर्णय-
- इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणाली तपासणार
- केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित यंत्रणांचीही चाचपणी
- इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिमचीही चाचपणी
- इंधन चालित अॅक्युएटर आणि फ्युएल सिस्टिमचीही बारकाईने पाहणी
- हायड्रॉलिक प्रणालीची स्थिती तपासणार
- टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा घेणार
- पॉवर अॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणं अनिवार्य
- 15 दिवसांत झालेल्या तांत्रिक बिघाडांच्या पुनरावलोकनानंतरच देखभाल प्रक्रिया पूर्ण
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू-
अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.