नवी दिल्ली : बँक एटीएममधून पैसे काढणं किंवा चेकबुक यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. तर क्रेडिट कार्डचं बिल उशिरा भरल्यानंतर लागणाऱ्या शुल्कावर मात्र जीएसटी आकारण्यात येणार आहे.


अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाने बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा पुन्हा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देत हे स्पष्टीकरण दिलं आहे.

वित्तीय सेवा विभागाने हा मुद्दा गेल्या महिन्यात महसूल विभागाकडे पाठवला होता.

डीजीजीएसटीआयच्या अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेला निःशुल्क सेवांवर टॅक्स वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. एसबीआयसह काही सरकारी बँकांनाही ही नोटीस दिली होती. या नोटीसमध्ये 2012 पासूनच्या टॅक्सची मागणी केली होती, ज्यामध्ये व्याज आणि दंडाचाही समावेश होता.

यानंतर बँकांनी हे प्रकरण अर्थ मंत्रालयासमोर मांडलं. हा टॅक्स बँका ग्राहकांकडून वसूल करण्याच्या तयारीत होत्या. या सेवांमध्ये चेकबुक आणि एटीएममधून पैसे काढण्याचा समावेश होता. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने बँकिंग सेवांवर जीएसटी लागू नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.