नवी दिल्ली : जमीन किंवा इमारत भाड्याने दिल्यास त्यावर आता वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी द्यावा लागणार आहे. त्यामुळे 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यास आता नव्या कराची भर पडणार आहे.


एवढचं नाही तर बांधकाम सुरु असलेल्या घराच्या हफ्त्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत यावर सेवाकर लागत होता.

केंद्र सरकार 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याच्या तयारीत आहे. यावर सहमती झाली असून कोणत्या वस्तू, कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये ठेवायच्या यावर चर्चा सुरु आहे.

मात्र जमीन आणि इमारतीच्या विक्रीला जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल. त्यावर आताप्रमाणेच स्टॅम्प ड्युटी लागेल. तसंच वीजेलाही जीएसटीमधून वगळल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सांगितलं.

1 जुलै, 2017 पासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्कर, सेवा कर आणि राज्यातील व्हॅट यांसारखे तमाम अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतील. केंद्रीय जीएसटी विधेयकानुसार, कोणत्याही स्वरुपात जमीन भाड्याने दिल्यास, जमीन हस्तांतरणाच्या परवान्यावर जीएसटी लागू होईल.

तसंच कोणत्याही इमारतीचा पूर्ण किंवा अर्धा भाग भाड्यावर दिल्यासही जीएसटी लागेल. हा कर रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील इमारतीवर लागू होईल.